मला अरेंज मॅरेजपासून वाचवा; यासाठी तरुणाने चक्क उभारले २० फुटी होर्डिंग्ज


बर्मिंगहम – आपण आजवर लग्नासाठी अनेक खटपटी करणारे तरुण पाहिलेच असतील. वधू-वर सूचक मंडळापासून अगदी टिंडरसारख्या डेटिंग अॅप्सपर्यंत सगळे पर्याय करून बघणारेही तरुण आहेत. पण आम्ही जी बातमी देणार आहोत, तो तरुण काहीतरी वेगळा आहे. बायको शोधण्यासाठी याने चक्क २० फुटांचे होर्डिंग्ज उभारले आहे आणि त्यासाठी हजारो-लाखो रुपये खर्च केले आहेत. त्याने या होर्डिंग्जवर मला अरेंज मॅरेजपासून वाचवा, असा मजकूर लिहिलेला आहे.

बर्मिंगहमच्या रस्त्यांवर साधारण २० फुटांचे तीन-चार होर्डिंग्स ब्रिटनमधील मोहम्मद मलिक या २९ वर्षीय तरुणाने उभारले आहेत. मला अरेंज मॅरेजपासून वाचवा, असे या होर्डिंगवर लिहिले आहे. त्याचबरोबर या पोस्टरवर FindMalikAWife.com ही वेबसाईटही दिली आहे. या वेबसाईटवर गेले असता त्यावर लिहिलेले आहे की, हाय, मी मलिक. तुम्ही माझा चेहरा कुठेतरी होर्डिंगवर पाहिलेला असेल. मी २९ वर्षांचा आहे, लंडनमधील ला विदामध्ये राहतो. मी एक व्यावसायिक आहे, फूडी आहे आणि धार्मिक आहे. मी अशा एखाद्या व्यक्तीच्या शोधात आहे, ती सध्या दीन संदर्भात काम करत आहे. धर्मासाठीचे काही अरबी शब्दही त्याने वापरले आहेत.

आपल्या अपेक्षांमध्ये मलिक याने लिहिलेले आहे की, आपल्याला बायको म्हणून कोणत्याही धर्माची मुलगी चालेल. पण तिने आपल्या नातेवाईकांशी जुळवून घेतले पाहिजे, मोकळेपणाने बोलले पाहिजे. आपण पंजाबी परिवारातील असल्याचेही त्याने नमूद केले आहे. त्याचबरोबर तो एकुलता एक आहे आणि त्याच्या परिवारात आई-वडील असल्याचेही त्याने सांगितले आहे. त्याने इच्छुकांसाठी फॉर्मही दिलेला आहे.

या फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती, वय, व्यवसाय अशी प्राथमिक माहिती आहे. आपण स्वतःसाठी स्वतःच बायको, जोडीदार शोधत असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. जोडीदार शोधण्यासाठी होर्डिंग्स उभारण्याची ही काही पहिली वेळ नाही. आपल्या मुलीसाठी नवरा शोधण्यासाठी एका आईनेही हा पर्याय निवडला होता.