काल दिवसभरात 58 हजारांहून कोरोनाबाधितांची नोंद, तर ओमायक्रॉनबाधितांचा आकडा 2100 वर


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव देशात वाढतच चालला आहे. अशातच नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने चिंता वाढवली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 58 हजार 97 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर 534 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाच्या ओमिक्रॉनचे 2135 बाधित समोर आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून दोन लाख 14 हजार 4 वर पोहोचली आहे. या महामारीत जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 82 हजार 551 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (मंगळवारी) 15 हजार 389 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 21 हजार 803 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

देशव्यापी लसीकरण मोहीमेतंर्गत कोरोना प्रतिबंधक लसीचे आतापर्यंत 147 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल (मंगळवारी) 96 लाख 43 हजार 238 डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत लसीचे 147 कोटी 72 लाख 8 हजार 846 डोस देण्यात आले आहेत.

तसेच आतापर्यंत देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या 2135 बाधितांची नोंद झाली आहे. या व्हेरियंटचे देशातील 24 राज्यांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर केरळ आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 653, दिल्लीत 464 आणि केरळात 185 रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.