सुरक्षेमधील त्रुटींमुळे नव्हे तर रिकाम्या खुर्च्यांमुळे सभा न घेताच परतले मोदी; व्हिडीओ शेअर करत काँग्रेस नेत्याची टीका


पंजाब – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये सुरक्षेसंदर्भातील मोठी चूक झाल्याने मोदींची सभा रद्द करण्यात आली. आंदोलकांनी मोदींचा ताफा अडवल्यामुळे त्यांची सभाच रद्द करावी लागली आहे. सुरक्षेमधील या गोंधळासंदर्भात पंजाबमधील काँग्रेस सरकारकडून केंद्रीय गृहमंत्रालयाने अहवाल मागवला आहे. पण त्याचवेळी काँग्रेसच्या समर्थकांकडून आता मोदींच्या सभेला गर्दीच नसल्याने सुरक्षेचे कारण देऊन सभा रद्द करण्यात आल्याचा दावा सोशल नेटवर्किंगवरुन केला जात आहे.

आज पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या या सभेच्या आधीच पाऊस सुरु झाला. पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे हवाई मार्गाने जाण्याच्या नियोजित कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला. पंतप्रधानांनी भटिंडामध्ये हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. पण, हवामानात सुधारणा न झाल्यामुळे त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. पण त्यांचा ताफा हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावरील फ्लायओव्हरवर अडवण्यात आला.

दुसरीकडे मोदींच्या सभेच्या ठिकाणी पाऊस पडू लागल्यामुळे अनेकांनी खुर्चा, बॅनर्स आणि इतर प्रचार साहित्य डोक्यावर धरुन पावसापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. हजारो लोक या ठिकाणी सभेला उपस्थित राहतील अशापद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी हजारो खुर्चा ठेवण्यात आलेल्या. या खुर्चांचा वापर अनेकांनी पाऊस पडल्यानंतर आसरा घेण्यासाठी केला. याच पावसाचा आणि त्यामुळे सभेच्या ठिकाणी उडालेल्या गोंधळाचा व्हिडीओ युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बि. व्ही. यांनी ट्विटरवरुन शेअर केला. पंतप्रधान मोदींच्या हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाच्या ठिकाणी होणाऱ्यासभेमधील हा व्हिडीओ शेअर करत श्रीनिवास यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.


“कथित सुरक्षेमधील चूक” या कॅप्शनसहीत हा व्हिडीओ श्रीनिवास यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सभेच्या ठिकाणी पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. पण त्याचबरोबर सभेसाठी मंचासमोर मांडण्यात आलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत आहेत. सभेच्या ठिकाणी रिकाम्या खुर्च्यांच्या रांगांमध्ये उभे राहून हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ आधी मैदानाच्या मागील बाजूस आणि नंतर मंचाकडे पॅन होऊन सभेसाठी मैदानामध्ये गर्दी नसल्याचे दर्शवत आहे. या व्हिडीओमधून श्रीनिवास यांना सुरक्षेत चूक झाली म्हणून नाही तर रिकाम्या खुर्चांमुळे पंतप्रधानांनी सभा रद्द केली, असे सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, आता एकीकडे काँग्रेसकडून सभेला गर्दी नसल्याचा दावा केला जात असतानाच दुसरीकडे भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या सभेला घाबरुन त्यांच्या कार्यक्रमामध्ये पंजाब सरकारने व्यत्यय आणल्याचा आरोप केला जात असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विटरवरुन केला आहे.