वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी कालीचरण महाराजांना एक दिवसांची पोलीस कोठडी


पुणे – १९ डिसेंबरला पुण्यातील नातूबागेत एक कार्यक्रम झाला होता. कालीचरण महाराज यांनी त्यावेळी वादग्रस्त भाषण केल्याची घटना घडली होती. खडक पोलीस स्टेशनमध्ये त्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या प्रकरणी कालीचरण महाराज यांना पुणे पोलिसांनी रायपुर येथून अटक केली होती. शिवाजीनगर न्यायालयामध्ये आज हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

कालीचरण महाराजांनी १९ डिसेंबर रोजी पुण्यात वादग्रस्त भाषण केले होते. त्यावेळी त्याच्यासह उपस्थित असलेले मिलिंद एकबोटे, रमाकांत एकबोटे, दिपक नागपुरे, मोहन शेटे आणि कॅप्टन दिगेंद्र कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज कालीचरण महाराज यांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयामध्ये पोलीस म्हणाले की, कालीचरण महाराजांसोबत त्या दिवशी असलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेणे गरजेचे आहे. तसेच कालीचरण महाराजांचे व्हॉईस सॅम्पल घ्यायचे आहेत आणि इतर आरोपींसोबत मिळून कालीचरण महाराजांचा दंगल भडकावण्याचा प्रयत्न होता का? याचीही चौकशी करायची आहे. तसेच, सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी देखील पोलिसांकडून करण्यात आली. त्यावर सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद झाल्यावर न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

राज्यभरात कालीचरण महाराजांचे भक्तगण मोठ्या प्रमाणावर आहेत. आज न्यायालयात हजर करणार असल्याचे समजताच न्यायालयाच्या आवारात तरुण वर्ग उपस्थित होता. त्यामुळे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण तरी देखील न्यायालयामधून बाहेर पडताच भक्तांनी कालीचरण महाराज की जय घोषणा देण्यास सुरुवात केली. तर काहींनी त्याच्या पाया पडण्याचा प्रयत्न देखील केला. त्यावर पोलिस सर्वांना बाजूला करत असताना पोलीस आणि भक्तांमध्ये काही काळ वाद देखील झाला.