कोरोनासंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती!


मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या आणि ओमिक्रॉनची भिती या पार्श्वभूमीवर लॉकडाउन पुन्हा एकदा लागू होणार का? याबाबतची चर्चा सुरू झाली होती. अजित पवार यांनी या पार्श्वभूमीवर काल पुण्यात बोलताना मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत याविषयीचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले होते. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये राज्यातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच रुग्णवाढ आणि लसीकरणाचा वेग यावर देखील झालेल्या चर्चेनंतर राज्यात सध्या लॉकडाऊन लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहाता टास्क फोर्सने लॉकडाऊनऐवजी ऑगमेंडेट रिस्ट्रीक्शन्स लागू करण्याचा प्रस्ताव दिल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. ऑगमेंटेड रिस्ट्रीक्शन्स असा शब्द टास्क फोर्सने वापरला आहे. म्हणजे अशीच संख्या वाढत गेली, तर लॉकडाऊनसारखा १०० टक्के बंद करण्याची गरज आज तरी नाही. पण अनावश्यक गोष्टींवर दररोजची बाधितांची संख्या तपासून बंधने आणता येतील का? याविषयीचा निर्णय घेतला जाईल. या व्हायरसला रोखण्यासाठी गर्दी थांबवणे गरजेचे आहे. त्यानुसार गर्दी करणाऱ्या गोष्टींवर काही निर्बंध टाकण्यासाठी निर्णय घेतला जाईल. पण आजच त्यावर निर्बंध टाकले जातील, असे नाही. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली असून त्या त्या वेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे म्हणाले.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, ती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधितांना गृह अलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. कोरोनाची गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी कोरोना रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोरोना सेंटर, कोरोना हेल्थ सेंटर व कोरोना रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा, याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्याचे देखील राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयांनी बूस्टर डोस देण्याची परवानगी मागितली होती. स्वखर्चाने देखील हे आरोग्य कर्मचारी बूस्टर डोस घेतील, असे देखील या रुग्णालयांकडून सांगण्यात आल्यानंतर आता रुग्णालयांना त्यांच्या पातळीवर बूस्टर डोस घेण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. त्याचबरोबर प्रत्येकाची आरटीपीसीआरच करणे यामुळे टेस्टिंग विभागावर ताण पडेल. त्यामुळे राज्याची जेवढी क्षमता आहे, त्यानुसार रोज साधारण २ लाख चाचण्या व्हायलाच पाहिजेत. पण त्यावरही अँटिजेन टेस्ट करण्यावर भर द्यावा लागेल. अँटिजेन पॉझिटिव्ह आल्यानंतर पुन्हा आरटीपीसीआर करण्याची गरज नसल्याचेही राजेश टोपे म्हणाले.