देशातील सर्वात मोठ्या सरकारी वीज उत्पादक कंपनीला कोळसा पुरवणार गौतम अदानींची कंपनी


नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठ्या ऊर्जा उत्पादक कंपनीला परदेशी कोळसा पुरवठा करण्याचे मोठे काम देशातील आघाडीच्या उद्योगांपैकी एक असलेल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडला मिळाले आहे. देशात गेल्या वर्षी कोळशाच्या टंचाईमुळे वीजनिर्मितीसह अनेक कामांवर परिणाम झाला होता. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सरकारी मालकीच्या एनटीपीसी लिमिटेडने गेल्या ऑक्टोबरमध्ये दोन वर्षांत प्रथमच कोळसा आयातीसाठी निविदा काढली. त्यानुसार ही जबाबदारी देण्यात आली आहे. देशात आयात करण्यात येत असलेला थर्मल कोळशाचे सर्वात मोठे व्यापारी असलेल्या अदानी यांना वीज कंपनीला दहा लाख टन कोळसा पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे.

यासंदर्भात एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अदानींकडून आपल्या पॉवर प्लांटना समान प्रमाणात पुरवठा करण्याच्या प्रस्तावावर सरकारी मालकीची दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन लिमिटेड कोलकाता देखील विचार करत आहे. हा करार भविष्यात होण्याची शक्यता आहे. कोळशाच्या तुटपुंज्या पुरवठ्यामुळे देशांतर्गत वीज उत्पादकांवर त्यांचा साठा वाढवण्याचा दबाव आहे. वाढत्या मागणीमुळे गेल्या वर्षी देशाला टंचाईचा सामना करावा लागला. यामुळे काही राज्यांमध्ये विजेचा तुटवडा निर्माण झाला आणि विजेवर चालणाऱ्या उद्योगांवर याचा परिणाम झाला.

सरकार इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी वचनबद्ध असतानाही परदेशातून कोळसा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील वीजनिर्मितीमध्ये कोळशाचा वाटा सुमारे ७० टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन ऊर्जेच्या साधनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देत असले तरी पुढील काही वर्षांमध्ये त्याचा वापर वाढण्याचा अंदाज आहे.