केंद्र सरकारने हिंदू महिलांचे अश्लील फोटो शेअर करणाऱ्या Telegram Channel वर केली कारवाई


नवी दिल्ली – एका टेलीग्राम चॅनेलवर केंद्र सरकारने कारवाई करत ते ब्लॉक केले आहे. हिंदू महिलांचे अश्लील फोटो या चॅनेलवरुन शेअर केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. ही कारवाई बुली बाई अ‍ॅप प्रकरण समोर आलेले असतानाच करण्यात आली आहे. इंटरनेटवर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे छायाचित्रे वापरुन आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी बुली बाई अ‍ॅप्लिकेशन निर्माता व ट्विटर हॅण्डल चालवणाऱ्या विरोधात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केल्यानंतर तीन जणांना या प्रकरणामध्ये मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

बुली बाई अ‍ॅप प्रकरणानंतर ट्विटरवरुन या टेलिग्राम चॅनेलसंदर्भातही अनेकांनी तक्रार केली होती. याच तक्रारीची दखल माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने घेतली असून त्यानंतरच हे चॅनेल ब्लॉक करण्याची कारवाई करण्यात आली आहे. हे चॅनेल ब्लॉक करण्यात आले असून सध्या राज्यातील पोलिसांसोबत या प्रकरणासंदर्भातील चर्चा सुरु असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. टेलिग्राम चॅनलसंदर्भातील तक्रारींवर ट्विट करुन केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालवे, अशी मागणी करणाऱ्या ट्विटलाच अश्विनी यांनी रिप्लाय करुन दिली माहिती दिली आहे. जून महिन्यात हे संबंधित चॅनेल तयार करण्यात आले असून त्यावरुन हिंदू महिलांचे अश्लील फोटो शेअर केले जात असल्याचा दावा ट्विटर थ्रेडमध्ये करण्यात आलेला.

दुसरीकडे, बुली बाई अ‍ॅप प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी १८ वर्षीय श्वेता सिंग या तरुणीला मंगळवारी अटक केल्यानंतर आज उत्तराखंडमधून पोलिसांनी आणखीन एकाला ताब्यात घेतले आहे. उत्तराखंडमधून या प्रकरणी आतापर्यंत एकूण दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. २१ वर्षीय मयंक रावल, १९ वर्षीय श्वेता सिंह आणि १९ वर्षीय कुमार झा यांना अत्तापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. श्वेताप्रमाणेच, रावल याचाही काही ट्विटर हँडल वापरून ट्विटरवर बुली बाई अ‍ॅपच्या प्रचार करण्यात सहभाग असल्याचा संशय होता. याच प्रकरणात आज सकाळी त्याला अटक करण्यात आली. रावलला स्थानिक न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर केले जाईल आणि अटक केलेल्या दोन आरोपींना आज रात्री मुंबईत एकत्र आणले जाईल, असे पोलिसांच्या सुत्रांनी सांगितले आहे.