भाजपा कार्यकर्त्यांनी घराबाहेर केलेल्या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड म्हणतात…


मुंबई – ओबीसींसंबंधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. यावरुन विरोधकही आक्रमक झाले असून जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केले होते. दरम्यान यानंतर भाजप आक्रमक झाली असून जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस नेहमी सावध असता. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते, त्यामुळे पोलीस दोन्ही बाजूने सांभाळत असतात, असे आव्हाड म्हणाले. दरम्यान त्यांनी यावेळी आपण कधीच बेसावध नसल्याचेही म्हटले आहे. मी कधीच बेसावध नसतो आणि मी डगमगणारा माणूस नाही. जे काही मी बोलतो ते मनापासून बोलतो. मुंह में राम बगल में छुरी, असा आपला स्वभाव नसल्याचे ते म्हणाले. भाजपच्या मोर्चासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ठीक आहे ना…काढू दे मोर्चा. जेव्हा खरा मोर्चा काढायची वेळ होती, तेव्हा ते रथयात्रेत होते. हे असे सर्व होत राहते.


दरम्यान त्यांनी जितेंद्र आव्हाडांना धमकीवजा इशारा देत केलेल्या ट्विटसंबंधी विचारण्यात आले असता म्हणाले की, तो इशारा नव्हता…अन्यथा मी घरातून निघून जाईन असे म्हणणे होते. त्याला तुम्ही इशारा समजत आहात. मला मारले बिरले तर लफडे व्हायचे म्हणून तर मी ९ वाजता घऱ सोडून आलो. माझ्याबद्दल प्रेम आहे म्हणून कार्यकर्ते जमले असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे समर्थन केले. तुमच्या चाळीत एखादे लफडे झाले आणि तुमच्या अंगावर कोण आले, तर चाळकरी खाली उतरतात ना? असा प्रतिप्रश्नही त्यांनी विचारला.


जितेंद्र आव्हाड यांनी याआधी आपल्या घरावर मोर्चा निघणार असून पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. यावेळी त्यांनी अन्यथा असा उल्लेख करत अप्रत्यक्ष इशाराही दिला होता. उद्या माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी २ बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शनजवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा……जय भीम!, असे आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.