पासपोर्टच्या रंगांचा हा असतो विशेष अर्थ

जगात जेव्हढे देश आहेत त्या त्या देशाचे स्वतंत्र पासपोर्ट आहेत. पासपोर्टसाठी प्रामुख्याने विशेष चार रंगांचा वापर केले जातो असे पाहायला मिळते. अर्थात यामागे काही विशेष कारण आहे. लाल, हिरवा, निळा आणि काळा हे चार प्रमुख रंग पासपोर्ट साठी वापरले जातात पण या रंगांच्या वेगळ्या वेगळ्या शेड सुद्धा काही देशांनी त्यांच्या पासपोर्ट साठी निवडल्या आहेत. या चार रंगामागच्या अर्थ आपल्याला काहीतरी सांगत असतो.

लाल रंगाचे पासपोर्ट हे साम्यवादी इतिहास असलेल्या देशांनी आवर्जून स्वीकारल्याचे दिसते. पासपोर्ट साठी हा सर्वात लोकप्रिय रंग आहे, युरोपीय संघ देशांनी सामान्य पासपोर्ट मॉडेल साठी हाच रंग निवडला आहे. युरोपीय देशात सामील होण्यास इच्छुक असलेल्या तुर्क, अल्बानिया अश्या अनेक देशांनी गेली काही वर्षे याच रंगाचे पासपोर्ट देण्यास सुरवात केली आहे.

लाल पाठोपाठ पासपोर्टसाठी पसंती असलेला रंग आहे निळा. हा रंग नव्या दुनियेचे प्रतिनिधित्व करतो. अमेरिका महाद्वीप देशात म्हणजे युएसए, अर्जेन्टिना, कोस्टारिका अलसाल्वाडोर, ब्राझील, कॅनडा, १५ कॅरेबियन देश यांनी पासपोर्ट साठी निळा रंग स्वीकारला आहे. तर हिरव्या रंगाचे पासपोर्ट मुस्लीम देशांनी स्वीकारले आहेत. हिरवा हा मुस्लिमांचा पवित्र रंग आहे. मोरोक्को, सौदी, पाकिस्तान, अनेक पश्चिम आफ्रिकी देश, नायजेरिया, बुर्कीनो फासो, घाना अश्या अनेक देशांचा यात समावेश आहे.

काळा रंग फार थोड्या देशांनी पासपोर्ट साठी निवडला आहे. मलावी, ताजिकिस्तान, डोमिनिक रिपब्लिक, त्रिनिदाद, टोबॅगो आणि बोट्स्वाना, काँगो अश्या काही देशात या रंगाचा पासपोर्ट आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडने सुद्धा पासपोर्ट साठी काळा रंग निवडला आहे पण त्याचे कारण म्हणजे काळा त्यांचा राष्ट्रीय रंग आहे.