आरबीआयचा एअरटेल पेमेंटला शेड्युल बँक दर्जा

देशाला आता आणखी एक शेड्युल बँक मिळाली आहे. रिझर्व बँकेने एअरटेल पेमेंट बँकेला शेड्युल बँकेचा दर्जा दिला असल्याचे मंगळवारी जाहीर केले. रिझर्व बँक अॅक्ट १९५४ नुसार हा दर्जा दिला गेला असून ही बँक आता शेड्युल कमर्शियल बँक म्हणून ओळखली जाईल. एअरटेल पेमेंट, सरकार कडून जारी केले गेलेले प्रस्ताव, प्राथमिक लिलाव, कल्याणकारी योजना यात सहभागी होऊ शकणार आहेच पण केंद्र आणि राज्य सरकार बरोबर व्यवसाय सुद्धा करू शकणार आहे.

वित्तवर्ष २०२१ मध्ये एअरटेल पेमेंटने नवीन खाती उघडण्यात उल्लेखनीय कामगिरी केली असून ११५ दशलक्ष ग्राहक आधारावर वाढत चाललेली डिजिटल बँक आहे. बँक नफ्यात आहे. एअरटेल थँक्स अॅप व ५ लाखाहून अधिक बँकिंग केंद्रांच्या नेटवर्क माध्यमातून डिजिटल सेवा दिली जात असल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अनुव्रत विश्वास यांनी सांगितले. ते म्हणाले बँकेच्या विकास यात्रेत शेड्युल बँकेचा दर्जा हा मैलाचा दगड ठरेल त्यासाठी आरबीआयचे आभार.

एअरटेल पेमेंट हे संपूर्ण एंड टू एंड डिजिटल बँकिंग सेवा असून अतिशय सरळ, सुरक्षित आणि फायद्याची आहे. व्हिडीओच्या माध्यमातून एक मिनिटात खाते उघडता येते. बचत कार्यक्रमाअंतर्गत रिवॉर्ड योजना आहे. ग्राहकाने डिजिटल रुपात देवघेव केली कि रिवॉर्ड दिले जाते असे समजते.