जेव्हा लढायची वेळ आली, तेव्हा लढण्यासाठी मैदानात नव्हते ओबीसी : जितेंद्र आव्हाड


मुंबई : मंडल आयोग आला त्यावेळी आयोगाचे आरक्षण ओबीसींसाठी होते. पण जेव्हा लढायची वेळ आली, तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. तर महार आणि दलित लढायला होते. कारण ओबीसींना लढायचेच नसते. कारण ओबीसींवर ब्राह्मान्य वादाचा पगडा बसला आहे. पण हे त्यांना माहिती नाही की, आपल्या चार पिढ्यांपर्यंत आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळातही येऊ दिले जात नव्हते. तुम्ही हे विसरलात. त्यामुळे माझा ओबीसीवर फारसा विश्वास नसल्याचे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, आरक्षणाच्या निमित्ताने का होईना आता ओबीसी पुढे येत आहेत. पण नुसते पुढे येऊन आणि घरात बसून व्हॉट्सअॅप करुन चालणार नाही. त्यासाठी रस्त्यावर यावे लागेल. सरकारशी दोन हात करावे लागतील. ओबीसी समाजातील 50 टक्के लोकसंख्या आज महाराष्ट्रात आहे. तरीही हा महाराष्ट्र आपल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही हे लक्षात घ्यायला हवे.

ठाण्यामध्ये आग्र्यांची संख्या किती 5 ते10 टक्के आहे. पण त्यांचे नगरसेवक किती आहे? असा प्रश्न करत आव्हाड म्हणाले, भूमीपुत्रांचा समाजावर एक वेगळा पगडा असतो. परंतु, त्यांना लढायचे नाही, जे मिळेल, ते घ्यायचे, असेल हरी तर देईल खाटल्यावरी अशी त्यांची वृत्ती असते. असे मेळावे ओबीसी बांधवांसाठी घेणे सोपे आहे. पण, असे मेळावे घेऊन चालणार नाही. मैदानात उतरुन केंद्र सरकारला सांगावे लागेल की, आमचे आरक्षण तुम्हाला काढता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला संसदेमध्ये बिल आणावे लागेल. 50 टक्क्यांची मर्यादा घालवावी लागेल. त्याबरोबरच शोषित, मागासांना न्याय द्यावा लागेल असे आव्हाड म्हणाले.

ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले, त्याचवेळी त्यांनी सांगितले होते की, दारिद्र्य निर्मूलनाचे आरक्षण हे काम नाही. पण जे शोषित, वंचित आहेत, ज्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येता आले नाही, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे असेल, तर त्यांना आरक्षण द्यावेच लागेल, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.