व्हिडिओ ; मणिपूर आणि त्रिपुरा दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी परत वाजवला ढोल


इंफाळ – आज इंफाळमध्ये ४ हजार ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या २२ प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन आणि पायाभरणी केली. आज इंफाळ येथून पंतप्रधान मोदींनी मणिपूर आणि त्रिपुरा दौऱ्याला सुरुवात केली आहे. ते यावेळी म्हणाले, आतापासून काही दिवसांनी म्हणजे २१ जानेवारीला मणिपुरला राज्याचा दर्जा मिळाल्याच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण होतील. सध्या देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने अमृत महोत्सवही साजरा करत आहे. ही वेळ स्वत:मध्येच एक मोठी प्रेरणा आहे.


पंतप्रधान मोदींचे यावेळी मणिपूर येथे विविध पारंपारिक वाद्य वाजून स्वागत करण्यात आले. तेव्हा मोदींनी देखील स्वत: ढोल व अन्य वाद्य वाजवून कलाकारांचा उत्साह वाढवल्याचे दिसून आले. पंतप्रधान मोदी या भेटीदरम्यान आगरतळा येथील विमानतळावरील नवीन इमारतीचे उद्घाटन करतील आणि दोन महत्त्वाच्या विकास योजनांचा शुभारंभ करतील. मणिपूरमध्ये, पंतप्रधान मोदी १ हजार ८५० कोटी रुपयांच्या १३ प्रकल्पांचे उद्घाटन करतील आणि २ हजार ९५० कोटी रुपयांच्या नऊ प्रकल्पांची पायाभरणी करतील. हे प्रकल्प रस्ते पायाभूत सुविधा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, आरोग्य, शहरी विकास, गृहनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि कला आणि संस्कृती यासह विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत.