नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार अरविंद सावंत कोरोनाबाधित


मुंबई – राज्यातील कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून चित्र दिसत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात येत आहे. सुप्रिया सुळे, एकनाथ शिंदे, यशोमती ठाकूर यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. दरम्यान आता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


याबद्दलची माहिती एकनाथ शिंदे यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही शिंदे यांनी केले आहे. एकनाथ शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी.


दरम्यान शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आता समोर आले आहे. ट्विट करत त्यांनीही याबद्दलची माहिती दिली आहे आणि आपण विलगीकरणात असल्याचे सांगितले आहे. आपल्या ट्विटमध्ये सावंत म्हणतात, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्यामुळे मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!