अमेरिकेत कोरोनाबरोबरच ओमिक्रॉनची त्सुनामी ; एक दिवसात आढळले तब्बल १० लाख बाधित


वॉशिंग्टन – कोरोनाची महामारीची तिसरी लाट जगभरात आल्याचे दिसून येत आहे. तर अमेरिकेत सोमवारी कोरोनाबाधित आकडेवारीचा नवा विक्रमच प्रस्थापित झाला. अमेरिकेत सोमवारी दिवसभरात तब्बल १० लाख नागरिक कोरोनाबाधित आढळून आले. सध्या अमेरिकेत कोरोनाबरोबरच ओमिक्रॉनची त्सुनामी आल्याचे चित्र दिसत असून, येथील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम होत आहे.

सध्या अमेरिकेत अत्यंत वेगाने पसरणाऱ्या व्हेरिएंटमुळे विक्रमी संख्येत बाधित आढळून येत आहेत. ही संख्या अन्य देशांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे. दोन वर्षांपूर्वी महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत नोंदवला गेलेला हा एक उच्चांक आहे. सोमवारी अमेरिकेत आढळलेली रूग्ण संख्या ही केवळ चार दिवसांपूर्वी आढळलेल्या बाधितांच्या दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेत चार दिवसांपूर्वी ५ लाख ९० हजारांच्या आसपास बाधित आढळल्याचे समोर आले होते.

सोमवारी अमेरिकेतील दैनंदिन प्रकरणांची संख्या इतर कोणत्याही देशात पाहिल्या गेलेल्या संख्येपेक्षा दुप्पट होती. भारतातील डेल्टा वाढीदरम्यान अमेरिकेबाहेर सर्वाधिक संख्या आली, ७ मे २०२१ रोजी जेव्हा ४,१४,००० हून अधिक बाधित आढळून आले. तसेच, सध्या विमानाची उड्डाणे वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द झाली आहेत, शाळा आणि कार्यालये बंद आहेत, रूग्णालयांवरील भार वाढला आहे.

त्याचबरोबर अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांचे संपूर्ण लसीकरण होऊन त्यांनी बुस्टर डोस देखील घेतलेला आहे. असे असतानाही त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.