राज्य सरकारचा उच्च न्यायालयात परब यांच्यावरील हल्ल्याचे नितेश राणे हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप


मुंबई – शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत झालेल्या हल्ल्या प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परब यांच्यावरील हल्ल्याचे नितेश राणे हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला आहे. आज उच्च न्यायालयात भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पार पडली आहे.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणघुमाळीत झालेल्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार नितेश राणेच आहेत, असा दावा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. आपला हा दावा सिद्ध करण्यासाठी याप्रकरणी आपल्याला प्रतिज्ञापत्र सादर करायचे असल्याची मागणी सरकारी वकिलांनी मंगळवारी न्यायालयात केली. ही मागणी स्वीकारत न्यायालयात या प्रकरणावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली.

शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता या प्रकरणाची पुढील सुनावणी घेण्याचे न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांनी निश्चित केले आहे. पण तोपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांचे वकील नितीन प्रधान यांनी न्यायालयाकडे केली. यावर सिंधुदुर्ग पोलिसांनी पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंवर कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याचे तोंडी आश्वासन उच्च न्यायालयात देण्यात आल्यामुळे भाजप आमदार नितेश राणेंना पुढील सुनावणीपर्यंत तूर्तास अटकेपासून दिलासा मिळालेला आहे.