टाटा घेऊन येत आहे दोन स्वस्त आणि मस्त सीएनजी कार


नवी दिल्ली – आपल्या आगामी सीएनजी कार्स लवकरच बाजारात आणण्याबाबतची माहिती भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने दिली आहे. टाटा कंपनी लवकरच टाटा टिगोर आणि टियागो या दोन सीएनजी इंजिन असणाऱ्या कार्स सादर करणार आहे. टाटा कंपनी आपल्या या कारमध्ये कंपनी फिटेड सीएनजीची सोय करुन देणार आहे.

एकीकडे सीएनजीचे भाव वाढत असले, तरी या आगामी टियागो कारमध्ये सोय असणाऱ्या सीएनजीच्या मदतीने कार चालकाला अवघ्या 2 रुपयांच्या किंमतीत एक किलोमीटरचा प्रवास करता येईल, असा दावा टाटा कंपनीने केला आहे. त्यामुळे पेट्रोल कारच्या तुलनेत ही कार ग्राहकांना फार अधिक परवडणार आहे.

आधीच सामान्यांच्या खिशाला सध्या वाढत असलेल्या पेट्रोल किंमतींमुळे कात्री लागली आहे. त्यातच इलेक्ट्रिक वाहनांनाही पूर्णपणे वापरात येण्याकरता अजून वेळ असल्यामुळे तोपर्यंत सीएनजी हेच व्हेरिएंट सर्वात परवडणारे आहे. त्यात सीएनजी भरण्यासाठी पंपावर बरीच प्रतिक्षा करावी लागत आहे. तसेच सीएनजी पंपही अधिक प्रमाणात नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पण यानंतरही खिशाला परवडत असल्यामुळे सीएनजी कार्स अधिक लोकप्रिय आहेत. टाटा कंपनीच्या अल्ट्रॉजमध्येही लवकरच सीएनजीची सोय देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.