केंद्राने महाराष्ट्राला काय दिले नाही हे राज्याच्या मंत्र्यांनी लेखी द्यावे – भारती पवार


नवी दिल्ली – महाराष्ट्र सरकारवर कोरोना काळात संथ गतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारने मागणी करूनही केंद्र सरकारने काय दिले नाही, याबाबत राज्यातील कुणी एका मंत्र्याने लेखी द्यावे, असेही म्हटले. राज्याने मागणी करूनही केंद्र सरकारने दिले नसेल, तर या राज्याची मी हक्काची मुलगी म्हणून ती माहिती मला द्या, असेही भारती पवार यांनी नमूद केले.

डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या, राज्य सरकार मागते आणि केंद्र सरकार देत नाही, असे महाराष्ट्रातील कुणी मंत्र्यांनी लेखी दिले, तर मलाही बरे होईल. आम्ही किती निधी दिला आणि त्यातील किती निधी राज्यात खर्च झाला हा पण प्रश्न उपस्थित होतो. केंद्र सरकारने आयसीयू बेड, ऑक्सिजनची क्षमता, औषधे यासाठी निधी मंजूर केला आहे. प्रत्येक जिल्ह्याला औषधांचा साठा उपलब्ध पाहिजे. याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून (NHM) देखील औषधांची मागणी करता येते.

राज्य सरकारने हे सर्व पाहता किती मागणी केली? त्यानंतरही केंद्राने दिले नसेल, तर या राज्याची मी हक्काची मुलगी म्हणून सांगते, मला तरी द्या. राज्य सरकारने काय मागणी केली आणि केंद्र सरकार काय देत नाही, याबाबत आम्हाला आजपर्यंत कोणतेही पत्र मिळाले नाही. उलट आम्ही हे दिले आता हे खर्च करा म्हणून सांगत आहे. राज्यात काम चालू आहे. राज्य सरकार काम करत नाही, असा माझा अजिबात आक्षेप नाही, परंतू संथगतीने काम चालू असल्याचा आरोप भारती पवार यांनी केला. आज आपण लवकर काम केले नाही, तर उद्या धावपळ होईल. राज्य सरकारने थोडी गती वाढवावी अशी माझी विनंती असल्याचेही भारती पवार यांनी नमूद केले.