Bulli Bai प्रकरणातील मुख्य महिला आरोपीला मुंबई पोलिसांनी उत्तराखंडमधून घेतले ताब्यात!


मुंबई – सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात देखील गेल्या दोन दिवसांपासून Bulli Bai प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. मुस्लीम महिलांचे फोटो Bulli Bai अॅपवर अपलोड करून आक्षेपार्ह भाषेत मजकूर टाकल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. अशाच प्रकारे एका मुस्लीम महिला पत्रकाराचे फोटो देखील अपलोड झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. मुंबई पोलिसांनी यानंतर दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारावर तपास केल्यानंतर बंगळुरूमधून एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. पण, या प्रकरणातील मुख्य आरोपीलाही आता अटक झाली असून ती एक महिला असल्याचे समोर आलं आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आधी बंगळुरूमधून एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली होती. या अॅपवर बुली बाईसारख्या आक्षेपार्ह मजकुरासाठी खोटी अकाउंट्स या तरुणाने सुरू केली होती. यातील काही अकाउंट्सला शीख नावे देण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या तरुणाची पोलीस चौकशी करत आहेत. त्यानंतर आज उत्तराखंडमधून या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी हा सगळा प्रकार घडवून आणणारी मुख्य आरोपी महिला असल्याचे सांगितले आहे. ही महिला बुली बाई अॅपशी संबंधित तीन खाती हाताळत होती. बंगळुरूमधून ताब्यात घेतलेल्या विशाल कुमार नामक तरुणाने खालसा सुप्रिमेसिस्ट नावाने एक अकाउंट ३१ डिसेंबर रोजी सुरू केले होते. यासोबत या अकाऊंटचे इतर बनावट खालसा सदस्य देखील दाखवण्यात आले होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

BulliBai नावाचे एक अॅप Github या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सौदेबाजी प्रकरणात सापडले आहे. या अॅपवर मुस्लीम महिलांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून त्यांचे फोटो अपलोड करून त्यांचा लिलाव करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मोठा वादंग यावरून निर्माण झाला. याबाबत मुंबई पोलिसांकडे एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर त्याचा तपास सुरू झाला. या प्रकरणात पोलिसांनी रविवारी बंगळुरूमधून एका २१ वर्षीय तरुणाला अटक केल्यानंतर आज उत्तराखंडमधून एका महिलेला ताब्यात घेतले आहे. ही महिलाच मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


याआधीही ६ महिन्यांपूर्वी असाच काहीसा प्रकार चर्चेत आला होता. तेव्हा Sulli Deal या नावाने मुस्लीम महिलांची अशा प्रकारे बदनामी करण्याचा प्रकार घडला होता. याबाबत तेव्हा तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. पण, अद्याप आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. दरम्यान यासंदर्भात राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करून मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.