जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका


मुंबई : गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्यावेळी मंडल आयोग आला, त्यावेळी आयोगाचे आरक्षण ओबीसींसाठी होते. पण जेव्हा लढायची वेळ आली, तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नसल्यामुळे ओबीसीवर माझा फारसा विश्वास नसल्याचे वक्तव्य केले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता आव्हाड यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने आयोजित,”सन्मान सावित्रीच्या लेकींचा”या कार्यक्रमात बोलताना ओबीसींवर टीका केली. गोपीचंद पडळकर यांनी आव्हाड यांच्या या वक्तव्याला उत्तर दिले. पडळकर म्हणाले, आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही. पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला आणि वंचितांच्या आरक्षणाला नाके मुरडली. स्वत:ला शेकडो ओबीसींनी पेटवून घेतले होते. हा ओबीसींचा इतिहास आव्हाडांना माहीत नाही का? असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.

केंद्राच्या नावाने मागचे दीड वर्ष फक्त ओरड केली. पण आता यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सध्या ते काय करत आहेत, याबद्दल कुठलीच माहिती नाही. राज्य मागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरू केले का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त असल्याची टीका आमदार पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता केली.

आमदार पडळकर यांनी मंत्री आव्हाड यांच्यावर टीका करताना महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले. एवढे प्रेम ओबीसींवर असेल तर सर्व ठिकाणी ओबीसी उमेदवार द्या आणि त्यांना निवडून आणणार का? असा प्रश्न यावेळी पडळकर यांनी उपस्थित केला.