दररोजच्या कोरोनाबाधित संख्येने २० हजारांचा आकडा ओलांडला तर मुंबई लॉकडाऊन – किशोरी पेडणेकर


मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला असून कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठ्याप्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढच होत आहे. मुंबई, पुणे या महानगरांमधील बाधित संख्या अधिक आहे. राज्य सरकारकडून या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी ऑफलाईन शाळा, महाविद्यालये ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषदेत बोलताना, नागरिकांना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना करत, जर रूग्ण संख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला, तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा सूचक इशारा दिला.

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, एकंदर परिस्थितीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल हे लक्ष ठेवून आहेत. जी यंत्रणा आपण उभी केली आहे, त्या यंत्रणेच्या माध्यमातून आजही मग विलगीकरण केंद्र असतील, रूग्णालये, गृह विलगीकरण या सगळ्यांकडे महापालिका म्हणून आमचे लक्ष आहे. कुणालाही आता लॉकडाऊन नको आहे, निश्चितच लॉकडाऊन असताच कामा नये. कारण, आता कुठेतरी सगळेजण सावरत आहेत आणि जर पुन्हा लॉकडाऊनचे सावट निर्माण झाले, तर सगळ्यांचे कंबरडे मोडेल. त्यामुळे जर सर्वांनी सर्व नियमांचे पालन केले, योग्य ती काळजी घेतली आणि सर्वजण जबाबदारीने वागले, तर आपल्याकडे लॉकडाऊन होणार नाही. पण दररोजच्या बाधितसंख्येने जर २० हजारांचा टप्पा ओलांडला, तर मात्र केंद्राने दिलेल्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल. याबाबत एक-दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री कोरोना परिस्थितीवर बोलू शकतात. कारण, बाधित संख्या तीन-चार पटीने वाढत आहे.

तसेच, वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे. पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग हे नेहमीप्रमाणे ऑनलाईन जसे पूर्वी सुरू होते, त्याप्रमाणे राहील असे सांगण्यात आलेले आहे. एकीकडे बाधितांची संख्या वाढत आहे. जरी घाबरण्याची गरज नसली, तरी तीन-चार पटी रूग्ण संख्या वाढणे ही बाब चिंताजनक आहे.

या पार्श्वभूमीवर जी काही निर्बंध घातली गेली आहेत आणि ज्या पद्धतीने लसीकरणावर आपण जोर देत आहोत, लशीचे दोन्ही डोस हे झालेच पाहिजे. १५ ते १८ वयोगटामधील मुलांचे कालच्या दिवसात दोन ते अडीच हजाराच्या आत बऱ्यापैकी ९ केंद्रांवर लसीकरण झालेले आहे. गर्दी टाळा, असे नेहमीच मुख्यमंत्री सांगत असतात, थोडसे दुर्लक्ष नक्कीच होत आहे. गर्दी टाळली पाहिजे, ही गर्दी टाळण्यासाठी शिवसेनेने आपले दोन कार्यक्रम देखील रद्द केले. त्यामुळे सर्वांनीच गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळले पाहिजे. नियमांचे पालन करून समारंभ केले पाहिजेत, असेही यावेळी पेडणेकर यांनी बोलून दाखवले.