आयसीएमआरची ओमिक्रॉनचे निदान करणाऱ्या ‘ओमीशुअर’ किटला मंजुरी


नवी दिल्ली – कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव देशात वेगाने होत आहे. अशातच आयसीएमआरकडून (ICMR) ओमिक्रॉन व्हेरिएंटचे निदान करणाऱ्या किटला मंजुरी देण्यात आली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे निदान ‘ओमीशुअर’ (Omisure) किट करणार आहे. टाटा मेडिकलने हे किट तयार केले असून याला आयसीएमआरने मंजुरी दिली आहे.

आतापर्यंत देशातील 23 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ओमिक्रॉनचे 1892 रुग्ण आढळून आले आहेत. ज्यापैकी 766 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत. ओमिक्रॉनचे सर्वाधिक 568 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यानंतर दिल्लीमध्ये 382, केरळात 185, राजस्थानमध्ये 174, गुजरातमध्ये 152 आणि तामिळनाडू 121 रुग्ण आढळून आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सोमवारी महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 68 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मुंबईमध्ये 40, पुण्यामध्ये 14, नागपूरमध्ये 4, पुणे ग्रामीण आणि पनवेलमध्ये प्रत्येकी 3, कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे.

तर गेल्या 15 दिवसांत दिल्लीमध्येही ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांत आढळलेल्या रुग्णांमध्ये 84 टक्के रुग्ण ओमिक्रॉनचे असल्याचे निष्पन्न झाले. ओमिक्रॉनचे वाढते संकट पाहता दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आज बैठक बोलावली आहे. डीडीएमएने 29 डिसेंबर रोजी आपल्या शेवटच्या बैठकीत दिल्लीत ‘यलो अलर्ट’ अंतर्गत लादलेले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे देशातील दैनंदिन बाधित आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच मास्क, लसीकरण, सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, घ्यायची खबरदारी आणि पावले पूर्वीप्रमाणेच राहतील.