जाणून घ्या आर्यन खानच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमागील सत्य


सोशल मीडियावर सध्या विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल होत असून एक तरुण नशेच्या धुंदीत चक्क विमानतळावर लघुशंका करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. काही नेटकऱ्यांकडून या व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान असल्याचा दावा केला जात आहेत. एनसीबीने आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती आणि जवळपास तीन आठवड्यांनंतर त्याचा जामीन मंजुर करण्यात आला होता.

एक तरुण नशेच्या धुंदीत विमानतळावर उभा असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याच्या शेजारीच विमानतळावरील अधिकारी लाल कपड्यांमध्ये उभा असल्याचे दिसत आहे. तो अधिकारी त्या तरुणाशी बोलत असतो, तेवढ्यात तो तरुण नशेच्या धुंदीत लघुशंका करण्यास सुरुवात करतो. सध्या सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. तो एका ट्विटर यूजरने शेअर करत, विमानतळावर आर्यन खान (शाहरुख खानचा मुलगा) नशेत असल्याचे दिसत आहे, असे म्हटल्यामुळे व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण आर्यन खान आहे की आणखी कुणी असा प्रश्न अनेकांना पडला आहे.


यासंदर्भात इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील तरुण हा आर्यन खान नसून ‘ट्वायलाइट’ या हॉलिवूड चित्रपटात काम करणारा कॅनेडियन अभिनेता ब्रॉन्सन पेलेटियर आहे. २०१२मध्ये त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. असे कृत्य केल्यानंतर ब्रॉन्सरला पोलिसांनी अटक केली होती. तसेच व्हायरल होणारा हा व्हिडीओ लॉस एंजेलिस विमानतळावरील आहे. ब्रॉन्सन नशेत असल्यामुळे त्याला विमानातून उतरवण्यात आले होते. त्याला काही वेळ आराम करण्यास सांगण्यात आले होते. पण काही वेळानंतर तो विमानतळावर लघुशंका करताना दिसला होता. या कृत्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. काही दिवसांनंतर तो दोषी आढळला आणि त्याला शिक्षा झाली. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील तरुण आर्यन खान नसल्याचे स्पष्ट झाले आहे.