लवकरच शिबानी दांडेकरसोबत विवाहबद्ध होणार फरहान अख्तर


सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे विवाहबंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकले. त्यापाठोपाठ आता अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे.

सूत्रांनी ‘बॉलिवूड लाइफ’ला दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात फरहान आणि शिबानी विवाह बंधनात अडकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मार्च महिन्यात फरहान आणि शिबानी लग्न करण्याचा विचार करत आहेत. पण कोरोनाचा वाढता प्रभाव आणि बॉलिवूड कलाकारांना होणारा कोरोनाचा संसर्ग पाहाता, त्यांनी लग्न खासगी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि कुटुंबिय हजेरी लावणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून फरहान आणि शिबानी एकत्र राहत आहेत. कोरोनामुळे त्यांना लग्न आणखी पुढे ढकलायचे नसल्यामुळे त्यांनी खासगी पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फरहान आणि शिबानीने लग्नासाठी ५ स्टार हॉटेल बुक केले आहे. तसेच ते इतर काही गोष्टींकडे ही लक्ष देते आहेत. लग्नासाठी त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटी डिझायनर सब्यासाचीकडून कपडे डिझाइन करुन घेतल्याची माहिती समोर आली आहे.

फरहान आणि शिबानी यांची भेट तीन वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. ते सतत एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्या दोघांचे फोटो कायम चर्चेचा विषय ठरत होते. पण आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.