उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेण्याचा इशारा


पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होत असून 18 टक्क्यांच्या वर पॉझिटिव्ही दर गेला आहे. त्यामुळे पहिली ते नववीच्या शाळा बंद करण्याच निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील 74 टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. उर्वरित नागरिकांना लसीचा दुसरा डोस न घेतल्यास कठोर निर्णय घेण्यात येईल, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिला आहे.

त्याचबरोबर मास्क नसेल तर 500 रुपये दंड आकरण्यात येणार आहे. मास्क नसेल आणि थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन डोस पूर्ण नसतील, तर हॉटेल, बस, शासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार नसल्याचेही पवारांनी म्हटले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले, तरच सगळ्या ठिकाणी प्रवेश अन्यथा प्रवेश मिळणार नाही. लसीचे दोन्ही डोस घेतले, तरच आता सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाईल. यापूर्वीही अनेकदा याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले होते. पण आजवर याचे पालन झाले नाही. आता मात्र याची अंमलबजावणी केली जाईल. हॉटेल, बार, शासकीय आणि खासगी आस्थापनामध्ये लशीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच प्रवेश दिला जाईल. लसीचे दोन डोस घेतले नसतील तर अशा व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वेगेवेगळ्या डिझाईनचे कापडी मास्क वापरण्याऐवजी थ्री लेअर किंवा N95 मास्क वापरावे. साधे मास्क सुरक्षित नाहीत.

10 जानेवारीपासून 60 वर्षावरील व्यक्तीला बूस्टर डोस दिला जाणार आहे. फ्रंटलाईन वर्कर काम करणाऱ्या व्यक्तीला देखील बूस्टर डोस दिला जाणार आहे. दर तीन दिवसांनी बाधित होण्याचा दर पुण्यात डबल होत आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढत आहे. आगामी 40 ते 45 दिवसात याचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. जगातील 105 देशात याचा संसर्ग झाला आहे.