30 जानेवारीपर्यंत पुण्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय


पुणे : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉनचा धोकाही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता त्यात पुण्याचीही भर पडली असून पुण्यातील पहिली ते नववीच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी हद्दीतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अद्याप पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील शाळांबाबत अद्याप निर्णय झाला नाही.


राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकेडवारीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यामधील पहिली ते नववी इयत्तेपर्यंतच्या सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच अकरावीचे वर्गही 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहे. दहावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. कॉलेज बंद करायची की नाहीत, याबाबत दोन दिवसांत निर्णय होणार आहे.

गेल्या आठवड्याभरात राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सहा दिवसांपूर्वी असलेल्या रुग्णवाढीच्या तुलनेत कालची रुग्णसंख्या तब्बल सहापटीने वाढली आहे. कोरोनाचा हा विस्फोट होत असताना राज्यात आणखी कठोर निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉलेज बंद करायची की नाहीत याबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.