कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीत वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय


नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जगासह देशात पुन्हा एकदा दिसून येत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. अशातच देशाच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या दिल्लीत वीकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केजरीवाल सरकारने हा निर्णय कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे घेतला आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः कोरोनाबाधित झाले आहेत.

दिल्लीमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विकेंड कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये नाईट कर्फ्यू यापूर्वीच लागू करण्यात आला होता. दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची (DDMA) आज महत्त्वाची बैठक पार पडली. वेगाने वाढणारे कोरोनाबाधितांचे आकडे लक्षात घेत कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याता आला होता. दिल्लीमधील पॉझिटिव्हिटी रेट वेगाने वाढत आहे.

याबाबत पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, डीडीएमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विकेंड कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये आवश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व सरकारी अधिकाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त खाजगी संस्थांमधून 50 टक्के वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सांगितले आहे.