कालीचरण महाराजांनंतर आणखी एका महाराजांचे महात्मा गांधींचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य


नरसिंगपूर – हरिद्वार आणि रायपूरमधील धर्म संसद काही दिवसांपूर्वी चांगलीच चर्चेत राहिली होती. रायपूरच्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींविरोधात अपशब्द वापरल्यामुळे चांगलेच चर्चेत होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कालीचरण महाराजांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर महात्मा गांधींबद्दल आणखी एका महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधींचा एकेरी उल्लेख करत त्यांना मध्य प्रदेशमधील तरुण मुरारी बापूंनी देशद्रोही म्हटले आहे. सोशल मीडियावर महाराजांच्या या भाषणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

महात्मा गांधींना नरसिंगपूरमध्ये सोमवारी भागवत कथा वाचक तरुण मुरारी बापू यांनी देशद्रोही म्हटल्यानंतर नरसिंगपूर स्टेशन गंज पोलिसांनी तरुण मुरारी बापूविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. नरसिंगपूरच्या छिंदवाडा रोडवर असलेल्या वीरा लॉनमध्ये श्रीमद भागवत कथेचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात तरुण मुरारी बापूंना बोलावण्यात आले होते. यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ हिंदीने दिले आहे.

महात्मा गांधींबद्दल तरुण मुरारी बापू म्हणाले की, देशाचे जो तुकडे करतो, तो राष्ट्रपिता कसा असू शकतो, माझा त्यांना विरोध आहे, ते देशद्रोही आहेत. महात्मा गांधी हे महात्मा नाहीत आणि ते राष्ट्रपिताही होऊ शकत नाहीत, कारण त्यांनी देशाचे तुकडे केल्यामुळे त्यांना देशद्रोहीच म्हटले पाहिजे. दरम्यान मुरारी बापूंचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर काँग्रेसने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आक्षेप नोंदवला होता. काँग्रेसने निवेदन देत तरुण बापूंवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत जिल्हा प्रशासनाने गंज पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दुसरीकडे आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे तरुण मुरारी बापूंनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या कार्यक्रमादरम्यान बॅनरमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नरसिंगपूरच्या छिंदवाडा रोडवरील वीरा लॉनच्या भागवत पंडालमध्ये हे संपूर्ण प्रकरण घडले आहे. या कार्यक्रमात भागवत कथा वाचण्यासाठी हरिद्वारहून संत तरुण मुरारी बापूंना बोलावण्यात आले होते.