कोरोनाबाधितांची आकडेवारीत पुनश्चः वाढ; मुंबई महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यास सुरुवात


मुंबई – मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होऊ लागल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासनाकडून आखल्या जात आहेत. प्रशासनाकडून निर्बंधाबाबतची नियमावली जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाबाधित व्यक्ती असलेली इमारत सील करण्याबाबत मुंबई महापालिकेने सुधारीत नियमावली जाहीर केली आहे.

एखाद्या इमारतीत किंवा विंगमध्ये राहत असलेल्या एकूण रहिवाशांपैकी २० टक्के रहिवाशांना कोरोनाची लागण झाल्यास संबंधित इमारत किंवा विंग सील केली जाणार आहे. कोरोनाबाधित व्यक्तींना होम क्वारंटाइनसाठी देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि नियमांचे सक्तीने पालन करावे लागणार आहे. हाय रिस्क संपर्कातील व्यक्तींना सात दिवस होम क्वारंटाईन राहावे लागेल. ५ व्या किंवा सातव्या दिवशी ते आरटीपीसीआर करू शकतील. जर लक्षणे आढळल्यास तात्काळ आरटीपीसीआर करावी लागेल, असेही महापालिकेच्या नव्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाबाधित व्यक्ती इमारतीमध्ये असल्यास त्यांच्या घरी औषधे, खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तू पोहचवण्याची जबाबदारी संबंधित इमारतीच्या सोसायटीवर असले, असे मुंबई महानगरपालिकेने म्हटले आहे. त्याशिवाय सील केलेली इमारत पुन्हा खुली करण्याबाबतचा निर्णय वॉर्ड पातळीवर घेण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, वॉर्ड वॉर रुमकडून कोरोना प्रोटोकॉल आणि इतर गोष्टींबाबत सहकार्य केले जाईल, असेही महानगरपालिकेने म्हटले आहे. या नव्या निर्देशांची अंमलबजावणी 4 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे ही महापालिकेने स्पष्ट केले आहे.