बर्फाळ सीमेवर जवानांना असे मिळते दोन मिनिटात जेवण

चीनी सीमा किंवा सियाचीन सारख्या हाडे गोठविणाऱ्या थंडीत राहणे आणि देशाच्या सीमेचे रक्षण करणे अतिशय अवघड काम आपले सैनिक रात्रंदिवस करत असतात. या सैनिकांना पोषक, शक्तीवर्धक जेवण मिळावे इतकेच नव्हे तर दोन मिनिटात ते तयार व्हावे आणि गरमागरम पदार्थांचा आस्वाद सैनिकांना घेता यावा यासाठी डीआरडीओने खास मस्त पदार्थ तयार केले आहेत. डीआरडीओची सहयोगी डीएफआरएल म्हणजे डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी मध्ये असे अनेक पदार्थ दीर्घ संशोधनातून तयार केले गेले आहेत. दुर्गम भागात हे रेडी टू इट पॅकेट फूड दोन मिनिटात गरम करणे, गरम पाणी वापरून पातळ करणे इतकेच काम करावे लागते.

कर्नाटकच्या मैसूर मध्ये डीएफआरएल कार्यरत आहे. दीर्घकाळ चांगल्या अवस्थेत राहू शकतील असे पदार्थ करण्यावर येथे संशोधन होते. पदार्थ गरम करता येतील शिवाय त्यात पुरेशी पोषक मुल्ये असतील आणि चवीला ते चांगले लागतील यासाठी विशेष संशोधन केले जाते. १५ ते २० दिवस टिकणाऱ्या पोळ्या, प्रोटीनने भरपूर हरभरा उसळ, फ्राईड चिकन, मटण, फीश करी, चिकन लेग पीस, विविध प्रकारचे पुलाव, पराठे, सोया चंक, आलू छोले, सोया श्रीखंड या शिवाय इडली, चविष्ट पावभाजी, शिरा, उपमा, असे अनेक पदार्थ सैनिकांना पुरविले जातात.

हे पदार्थ स्टरलाईज केलेल्या पॅकेट मधून काढून फक्त गरम करायचे आहेत. पुलाब, बिर्याणी,शिरा, उपमा सारखे पदार्थ गरम पाण्यात टाकले कि तयार होतात.हे सर्व पदार्थ सेवन करण्यास सुरक्षित, पटकन तयार होणारे आणि दीर्घकाळ टिकणारे असतील याची विशेष काळजी घेतली जाते. डीआरडीओची स्थापना १ जानेवारी १९५८ मध्ये झाली तर डीएफआरएलची स्थापना २८ डिसेंबर १९६१ मध्ये झाली आहे.