तिसरी लाट; कोरोनाबाधितांच्या संख्येत एकाच आठवड्यात 181 टक्क्यांनी वाढ


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनबाधितांच्या आकडेवारीतही मोठी वाढ होत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवार संपलेल्या आठवड्यात मागील सात दिवसांमध्ये तीनपटीने वाढ नोंदवण्यात आली आहे. देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील आठवड्यात 181 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे आता देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचे म्हटले जात आहे.

देशात एकाच आठवड्यात (27 डिसेंबर ते 2 जानेवारी) जवळपास 1.3 लाख नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ही संख्या मागील 12 आठवड्यातील सर्वाधिक संख्या आहे. या आधी सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद 5 ते 11 एप्रिल 2021 दरम्यान नोंदवण्यात आली होती. त्यावेळी देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू होती.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील आठवड्याच्या दरम्यान 41980 बाधितांची नोंद करण्यात आली. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढ होत आहे. बिहारमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत 12 पटीने वाढ नोंदवण्यात आली होती. त्याशिवाय, दिल्ली, पश्चिम बंगालमध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली होती.

महाराष्ट्रात रविवारी 11 हजार 877 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे झालेल्या गर्दीमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटनेही चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित महाराष्ट्रात आहेत. रविवारी दोन हजार 69 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात आतापार्यंत 65 लाख 12 हजार 610 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.21 टक्के एवढा झाला आहे. तर, राज्यात 510 ओमिक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे.