स्वप्नील जोशीच्या ‘अश्वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!


नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा सुपरस्टार स्वप्नील जोशीने आपल्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली असून, त्याच्या नवीन ‘अश्वत्थ’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अश्वत्थ’ 2022च्या हिवाळ्यात रिलीज होणार असून, या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर स्वप्नील जोशीने आज रिलीज करत असल्याची घोषणा केली.

भगवत गीतेतील एका लोकप्रिय अशा श्लोकाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला ‘अश्वत्थ’चा टीझर आहे. संस्कृतमधील या श्लोकाचा ढोबळ अर्थ असा जेव्हा मनुष्य योगारूढ होतो, तेव्हा तो आपला उद्धार स्वतःच करतो आणि स्वतःच आत्मबलाच्या सामर्थ्यावर ऊंची गाठतो. त्याने आपल्या आत्म्याचे अधःपतन होवू देता कामा नये. मनुष्य स्वतःच स्वतःचा बंधू असतो आणि स्वतःच स्वतःचा शत्रू असतो…’

चौखूर उधळलेल्या घोड्याच्या पृष्ठभूमीवर सादर होणाऱ्या या श्लोकानंतर टीझरमध्ये मराठी शब्द उधृत होतात. ते आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकारावर मात करून स्वाभिमानाने जगतो, तो अश्वत्थ. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक या टीझरच्या माध्यमातून या चित्रपटाच्या एकूण कथेबद्दल एक कल्पना अधोरेखित करतात. त्यातून मग या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली जाते.


या टीझरचा व्हीडीओ रिलीज करून स्वप्नील जोशीने आपल्या चाहत्यांबरोबर ही गोड बातमी शेअर केली आहे. तो म्हणतो, “नवीन वर्ष, नवीन संकल्प! नांदी…नव्या वर्षाची, नव्या संकल्पाची! नांदी.अश्वत्थची !!!”

प्रख्यात दिग्दर्शक लोकेश गुप्तेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवा मैलाचा दगड उभा करण्यास तो सज्ज झाला आहे. मकरंद देशपांडेचा आवाज टीझरमध्ये ऐकू येतो. त्यामुळे यात मकरंदसुद्धा आहे का, याबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे. हा चित्रपट 2022च्या हिवाळ्यात रिलीज होणार आहे.