एक व्यक्तीच्या बँक लॉकरमधून पोलिसांनी जप्त केले १००० वर्षे जुने ५०० कोटी किमतीचे पाचूचे शिवलिंग


तंजावर – तंजावरमधील एका व्यक्तीच्या बँक लॉकरमधून तामिळनाडूच्या सीआयडी पोलिसांनी गुरुवारी ५०० कोटी रुपयांचे पाचूचे बनवलेले शिवलिंग जप्त केले. यासंदर्भात WION दिलेल्या वृत्तानुसार एडीजीपी जयंता मुरली यांनी या कारवाईनंतर शुक्रवारी चेन्नई येथे पत्रकारांना सांगितले की, त्यांना तंजावरमधील एका घरात पाचूपासून बनवलेले शिवलिंग ठेवले असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर आम्ही तेथे छापा टाकला आणि त्या व्यक्तीच्या बँक लॉकरमधून ते जप्त करण्यात आले.

शिवलिंगाचे वजन ५३० ग्रॅम आणि उंची ८ सेमी आहे. एडीजीपी म्हणाले की, या शिवलिंगाची किंमत रत्नशास्त्रज्ञांनी ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले. शास्त्रोक्त विश्लेषण करून ते कोणत्या मंदिराचे आहे हे ओळखावे लागेल. वडील समियप्पन यांना पुरातन वास्तू कशी आणि कोठून मिळाली, याबाबत अरुण यांनी आपण स्वत: अनभिज्ञ असल्याचा दावा केला. नागपट्टिनमजवळील थिरुक्कुवलाई येथील जुन्या थ्यागराज स्वामी मंदिरातून २०१६ मध्ये ही चोरी झाली होती.

माहितीनुसार, ते केव्हा बनवले गेले असावे, हे वैज्ञानिक तपासातून कळू शकले नाही, परंतु ते हजार वर्षे जुने शिवलिंग असल्याचे मानले जाते. असे मानले जाते की हे पाचूपासून बनवलेले शिवलिंग पूर्व आशियाच्या दक्षिण भारतातील महाराज राजेंद्र चोल यांनी विकत घेतले आणि मंदिराला दिले.