31 जानेवारीपर्यंत बंद राहणार मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा


मुंबई : देशभरासह महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. त्यातच मुंबईतील कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जरी ऑफलाईन शाळा बंद असल्या, तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे. फक्त मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी हा निर्णय आहे.

दरम्यान शालेय शिक्षण मंत्री यांनी इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधितांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाची काय परिस्थिती आहे. त्यानुसार शाळा संदर्भात काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा करण्यात आली होती.

15 डिसेंबरपासून मुंबईमधील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबईमधील बहुतेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. मुंबईत काल दिवसभरात 8 हजार 63 नवे बाधित आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या लसींचे तीन लाख डोस उपलब्ध आहेत. दर आठवड्याला किंवा तीन-चार दिवसांनी आपल्याला लसीचा साठा उपलब्ध होत असतो. त्यामुळे लस साठ्याची अडचण येणार नाही. आधार कार्ड आणि शाळेच्या ओळखपत्राचा वापर करून लसीकरण करता येईल, अशी माहिती काकाणी यांनी दिली. सध्या मुंबईत रोज आठ हजार कोरोनाबाधित आढळत आहेत. आजही तेवढेच रूग्ण सापडण्याची शक्यता आहे. जरी कोरोनाबाधित वाढले, तरी त्याविरोधात लढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची पूर्ण तयारी झाली आहे. सध्या 30 हजारांपेक्षा जास्त खाटा उपलब्ध आहेत. त्याबरोबरच औषधे आणि व्हेंटिलेटरही उपलब्ध असल्याचे कांकणी यांनी सांगितले.