राजेश टोपे यांची केंद्राकडे 12 ते 15 वयोगटातील मुलांनाही लस देण्याची मागणी


जालना : 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरूवात झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थित जालन्यामधील आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुले खूप उत्साहाने लस घेत आहेत. त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणाचे काम केंद्र सरकारच्या सुचनेनुसार सुरू आहे. स्वतंत्र लसीकरणाची व्यवस्था केली असल्याची माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली. तसेच 12 ते 15 वयोगटातील मुलांना देखील लस देण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांच्याकडे केल्याचेही टोपे म्हणाले. दरम्यान, सध्या राज्यात लॉकडाऊनचा विचार नसल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.

कोरोनोला थांबवण्यासाठी 15 ते 18 वयोगटातील लसीकरणामुळे चांगला उपयोग होईल, असे ते म्हणाले. या गटातील मुले खूप फिरणारी असतात. त्यामुळे लसीकरणाची त्यांना खूप गरज होती. त्यादृष्टीने लसीकरण सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितले. वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बैठक झाली. याबाबत कमी दरात औषधे उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. तसेच कोरोना चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या किट्स उपलब्ध करुन देण्याची मागणीही केल्याचे टोपे यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना 12 ते 15 वयोगटातील मुलांना देखील लसीकरण करावे, अशी विनंती यावेळी केल्याची माहिती टोपे यांनी दिली.

आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे नियम आहेत. पण, सर्व राज्यांना समान नियम लागू करावेत, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्याचे देखील त्यांनी सांगितले. लहान मुलांना शाळेत जाऊनच लसीकरण करावे, अशी आमची योजना होती, पण, सुरक्षेच्या दृष्टीकोणातून आम्ही लसीकरण केंद्रावरचे लस देण्याचे नियोजन केल्याचे टोपे म्हणाले. राज्यात जवळपास 70 ते 80 लाख 15 ते 18 वयोगटातील मुले आहेत. त्या सर्वांना लस देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे टोपे म्हणाले. सुरक्षिततेचा विचार करुन लसीकरणाच्या बाबतीत आवश्यक ते बदल केले जातील, असे टोपेंनी यावेळी सांगितले.

राजकीय नेत्यांचे अनेक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. अशा कार्यक्रमात कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचा प्रश्न टोपे यांना केला असता, त्यांनी सांगितले की, सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. आयोजकांनी नियमांचे पालन करुन कार्यक्रम घ्यावेत. तसेच राजकीय नेत्यांनीसुद्धा त्यांना तसे सांगावे असे टोपे म्हणाले.