लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर


मुंबई – जानेवारी महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता एमपीएससीमार्फत सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

जानेवारी, 2022 मध्ये एमपीएससीमार्फत नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दोन जानेवारी 2022 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 आता 23 जानेवारी रोजी हाणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 आता 29 जानेवारीला होणार आहे. आधी ही परीक्षा 22 जानेवारी रोजी होणार होती. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा 2020, पेपर क्रमांक 2, पोलिस उपनिरीक्षक परीक्षा आता 30 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 29 जानेवारी रोजी होणार होती.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येमाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल. तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. याकरिता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे उमेदरवारांच्या हिताचे राहील, असे एमपीएससीने जारीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

डिसेंबर 2021 पर्यंतच्या राज्याच्या विविध विभागांकडून रिक्त जागांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मागवली होती. त्यानुसार राज्यात सात हजार 560 जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या जागा 2022 मध्ये भरण्यात येतील. त्यामुळे या वर्षात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे. राज्याच्या 25 विभागांमधील रिक्त असलेल्या पदांच्या संख्यानुसार राज्यात तिन्ही गटांच्या एकूण सात हजार 560 जागा रिक्त आहेत. त्यामध्ये ‘अ’ गटातील 1499, ‘ब’ गटातील 1245 आणि ‘क’ गटातील 1583 पदांचा समावेश आहे. या संदर्भातील सविस्तर रिक्त जागांची यादी ‘एमपीएससी’च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.