‘किचन कल्लाकार’मध्ये पंकजा मुंडे अन् रोहित पवार आमनेसामने


मस्त मजेदार ‘किचन कल्लाकार’ हा कुकरी शो काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे पडद्यावर उत्तम अभिनय करणारे हे कलाकार ज्यावेळी स्वयंपाकघरात शिरतात, त्यावेळी त्यांची कशी तारांबळ उडते, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे या शोमध्ये यावेळी एक नवा बदल पाहायला मिळणार आहे. कलाकारांच्या गर्दीत सजणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आता थेट राजकीय नेते येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे ही नेतेमंडळी हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे या वेळी या दिग्गजांमध्ये खुर्चीचाही एक डाव रंगणार आहे. विसरलेले पदार्थ पेठेतून आणण्यासाठी या स्पर्धकांना कधी युतीचा, तर खुर्चीचा सामना करावा लागणार आहे.