आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजची निवृत्ती!


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजने निवृत्ती घेतली आहे. गेल्या १८ वर्षांपासून मोहम्मद हाफिज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता. पण त्याने आता निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.’जियो न्यूज’च्या वृत्तानुसार, मोहम्मद हाफिज पाकिस्तान सुपर लीगच्या आगामी स्पर्धेसाठी लाहोर कलंदर्ससोबत करारबद्ध झाला आहे. त्यामुळे ४१ वर्षीय हाफीज फ्रँचायझी क्रिकेटसाठी उपलब्ध असेल. दरम्यान, हाफिजने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

२०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमधून हाफिजने निवृत्ती घेतली होती. हाफिजची कारकीर्द जवळपास दोन दशकांची राहिली आहे. पाकिस्तानसाठी त्याने ३९२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, त्याने ज्यात १२,७८९ धावा केल्या आणि २५३ बळी घेतले. हाफिजने ५५ कसोटी, २१८ एकदिवसीय आणि ११९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने तीन एकदिवसीय विश्वचषक आणि सहा टी-२० विश्वचषकांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व देखील केले.

झिम्बाब्वे विरुद्धच्या एकदिवसीय सामन्याद्वारे हाफिजने २००३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचा शेवटचा सामना नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीचा होता, ज्यात पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत, त्याला ३२ वेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तो शाहिद आफ्रिदी, वसीम अक्रम आणि इंझमाम-उल यांच्या नंतर सामनावीर पुरस्कार जिंकणारा सर्वात यशस्वी पाकिस्तानी खेळाडू आहे.