समीर वानखेडेंना मुंबई सोडण्यासाठी दिल्लीतून आली ऑर्डर


मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केल्यामुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे चांगलेच गोत्यात आले होते. आता त्यांचा मुंबईतील कार्यकाळ संपला असून दिल्ली गृहखात्याने सुद्धा वाढीव मुदत देण्यास नकार दिला आहे. एनसीबीचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ अनेक गंभीर आरोप झाल्यामुळे ३१ डिसेंबरला समीर वानखेडे यांचा कार्यकाळ संपला आहे.

पण, यासाठी त्यांनी वाढीव मुदत मिळावी जोरदार प्रयत्न केला. पण दिल्ली गृहखात्याने समीर वानखेडे यांना मुदतवाढ देण्यास नकार दिल्यामुळे समीर वानखेडे पुन्हा त्यांच्या कॅडरमध्ये जाणार आहे. ईडी एडीजी म्हणून त्यांची नियुक्ती होऊ शकते. तसेच समीर वानखेडे यांच्या नावाची एनआयएचे डिजी म्हणून देखील चर्चा आहे, याबद्दल दिल्लीत थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे. समीर वानखेडे आज रात्री ७.३० वाजता मुंबई-दिल्ली विमानाने दिल्लीला जाणार आहेत. तेथे त्यांना अधिकृतपणे मुदतवाढ नाकारल्याचे सांगितले जाईल आणि त्यांची नियुक्ती पुढे कुठे केली जाईल, याबाबत देखील सांगितले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

समीर वानखेडे यांचा कार्यकाळ तीन दिवसांपूर्वीच 31 डिसेंबरला संपला आहे. ऑगस्ट 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत त्यांनी 96 जणांना अटक केली आणि 28 गुन्हे दाखल केले. 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक केली आणि 117 गुन्हे दाखल केले. एनसीबीने पुढे माहिती दिली की समीर वानखेडेने सुमारे 1000 कोटी रुपयांचे 1791 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले आणि 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता गोठवली.

एनसीबीमध्ये काम करण्यापूर्वी समीर वानखेडे यांनी एअर इंटेलिजन्स युनिटचे (AIU) उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे अतिरिक्त एसपी म्हणून काम केल्यानंतर त्यांची कस्टम्सचे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि मुंबई विमानतळावर त्यांची नियुक्ती झाली. मुंबई एअर इंटेलिजेंस युनिटमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक सेलिब्रेटींना पकडले जे कस्टम ड्युटी चुकवत होते.