पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक


तुमसर – भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये राडा घातला होता. तसेच पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली होती. पोलिसांनी व्यापारी मित्रांना मारहाण केल्याचा अणि 50 लाख चोरी केले असल्याचा कारेमोरे यांनी आरोप केला होता. त्यांना आज त्यांच्या घरातून भंडारा पोलिसांनी अटक केली. त्यांना आज विविध कलमान्वये अटक करून न्यायालयात हजर केले आहे.

पोलिसांनी आमदार राजू कारेमोरे यांच्या व्यापारी मित्रांना बेदम मारहाण केल्यामुळे आमदार कारेमोरे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले होते. त्यांनी यावेळी पोलीस ठाण्यातच धिगांणा घातला होता. आमदारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काल रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र आमदारांच्या घरून 50 लाख रुपयांची रोकड घेऊन एका गाडीतून तुमसरकडे घेऊन जात होते.

यावेळी मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्ट्रॉंग रूमच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी गाडी चालकाला इंडिकेटर का दिले नाही? म्हणून गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली. गाडीतील यासिम छवारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर पोलीस आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. पटले आणि छवारे यांच्याजवळील 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळविल्याची तक्रार फिर्यादी यासिम छावारे यांनी मोहाडी पोलिसात दिली. बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक राणे यांनी देखील फिर्यादी यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केल्यानंतर आमदार राजू कारेमोरे यांनी माफी देखील मागितली होती.