रुपेरी पडद्यावर लोकशाहिर पठ्ठे बापूराव यांचा जीवनपट !


महाराष्ट्राला कधीच ‘श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनि सोवळे ठेवले घालुन घडी। हाती घेतली मशाल तमाशाची लाज लावली देशोधडी!’ असा आत्मगौरव करत तमाशा कलेला सुवर्णयुग दाखवणाऱ्या शाहिर पठ्ठे बापूराव यांच्या नावाचा विसर पडू शकत नाही. तमाशाने झपाटलेली असामी असे शाहिर पठ्ठे बापूराव यांचे वर्णन केले, तर ते चुकीचे ठरणार नाही. आजचा पैसा उद्या पाहायचा नाही आजची लावणी उद्या गायची नाही या तत्वाशी एकनिष्ठ असणाऱ्या शाहिर पठ्ठे बापूराव यांनी स्वत:चे काव्य व पहाड़ी आवाज या जोरावर तमाशाला नवे वळण दिले.

आपल्या हयातीत त्यांनी 2 लाखांहून अधिक लावण्या लिहिलेल्या आहेत. आता रुपेरी पडद्यावर लावण्यांचे विद्यापीठ असलेल्या या शाहिराची सांगितिक यशोगाथा दिसणार आहे. या चित्रपटाचे शिवधनुष्य दिग्दर्शक मिलिंद कृष्णा सकपाळ यांनी पेलले आहे. कांतीलाल भोसले, निलेश बबनराव देशमुख, रोहन अरविंद गोडांबे चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘द मॉर्निंगस्टार फिल्म कंपनी’ ‘असमथी प्रोडक्शन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

हा चित्रपट प्रा.चंद्रकुमार नलगे यांच्या महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव आणि पठ्ठे बापूरावांच्या शोधात या पुस्तकांवर आधारित असणार आहे. राहुल डोरले यांची चित्रपटाची कथा-पटकथा आहे. तर गीतकार गुरु ठाकूर यांच्या लेखनीतून गीते शब्दबद्ध केली जाणार आहेत. छायांकन केको नाकाहारा यांचे आहे. प्रोडक्शन डिझायनर संतोष फुटाणे, तर मेकअप अँड हेअर डिझायनर विक्रम गायकवाड आहेत. कॉस्ट्यूम डिझायनर सचिन लोवलेकर तर साउंड डिझायनरची जबाबदारी मंदार कमलापूरकर सांभाळणार आहेत. सुपर वाइजिंग प्रोड्युसर भास्कर पावस्कर आहेत.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक प्रमुख ओळख म्हणजे लावणी. शाहिर पठ्ठे बापूराव या लावणीच्या श्रृगांराचे सौंदर्य खुलवण्याचे काम यांनी केले. श्रीधर कृष्ण कुलकर्णी ते शाहिर पठ्ठे बापूराव हा त्यांचा कलंदर प्रवास नेमका कसा झाला ? हे या चित्रपटातून रसिकांसमोर येणार आहे. या संगीतमय चित्रपटाच्या संगीताचा प्रवास नेमका कसा असणार? आणि कोणता संगीतकार हे शिवधनुष्य लिलाय पेललणार हे अजून गुलदस्त्यात आहे. याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. शाहिर पठ्ठे बापूराव यांचा हा चित्रपट रसिकांसाठी लोककलावंतांसाठी एक अमूल्य भेट असेल एवढे मात्र नक्की!