मुंबई बँक निवडणुकीत प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलने सर्व 21 जागांवर मिळवला विजय


मुंबई – भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलचे मुंबई बँक निवडणुकीत एकहाती वर्चस्व राहिले. सर्व 21 जागांवर प्रवीण दरेकर यांचे सहकार पॅनेल विजयी झाले आहेत. यातील 17 जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. तर, उर्वरित चार जागांची मतमोजणी आज पार पडली.

दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार आज झालेल्या मतमोजणीत विजयी झाले. विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघातून पराभव केला. विठ्ठल भोसले यांना 18 मते, तर सुखदेव चौगुले यांना 16 मते मिळाली. प्राथमिक ग्राहक मतदार संघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना 131 मते, तर कमलाकर नाईक यांना 59 मते मिळाली. तर, महिला सहकारी संस्था मतदार संघ जयश्री पांचाळ यांना 332 मते, तर शालिनी गायकवाड यांना 188 मते मिळाली.

भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे यांना तब्बल 4 हजार मते मिळाली, तर यलाप्पा कुशाळकर यांना अवघी 350 मते मिळाली. प्रवीण दरेकर यांच्या पॅनलमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या उमेदवारांचा समावेश होता. तर, शिवसेना बंडखोरांनी चार ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली.

मुंबई बँकेत अभिजीत घोसाळकर, सुनिल राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. तर, निवडणुकीतून शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी माघार घेतली. तर कमलाकर नाईक यांनी बंडखोरी कायम ठेवली. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

दरम्यान प्रवीण दरेकर यांनी मुंबईतील सहकारी चळवळीतील लोकांनी मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवला असल्याने हा विजय मिळाला असल्याची प्रतिक्रिया दिली. बँकेचा विकास नाबार्ड, आरबीआयच्या निकषात काम केल्याने होत असल्यामुळेच आमच्या पॅनलला यश मिळाल्याचे दरेकर यांनी म्हटले.