ओबीसी आरक्षणाच्या डेटासंदर्भात अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती


सातारा – महाराष्ट्र सरकारने ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाबाबत काढलेला अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर ओबीसी आरक्षणावरुन राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरीकल डेटा गोळा करण्यावरुन आता खलबते सुरु आहेत. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महत्वाची माहिती दिली आहे.

अजित पवार यांनी म्हटले आहे की, मार्चपर्यंत ओबीसी आरक्षणाचा डेटा गोळा होईल अशी अपेक्षा आहे. याबाबत जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोगाच्या अध्यक्षांना विचारले होते, तेव्हा त्यांनी दोन महिन्यांत डेटा गोळा करू असे सांगितले होते. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न देशातील अनेक राज्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यासाठी केंद्र सरकारनेच कायदा करायला हवा होता. पण ही मागणी आम्ही केली की ते म्हणतात, आम्ही टोलवाटोलवी करतो, असेही अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार सावित्रीबाई फुलेंच्या 191 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगावमध्ये असलेल्या सावित्रीबाईंच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आले होते. नायगावमधील नेवसे वाड्यामध्ये हे स्मारक आहे. 3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाई फुलेंचा जन्म त्यांचे वडील खंडोजी नेवसे यांच्या नायगावमधील या वाड्यात झाला होता. आता या वाड्याचे राज्य शासनातर्फे स्मारकामध्ये रुपांतर करण्यात आले आहे.

या स्मारकाविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, सावित्रीबाई फुलेंच्या जन्मस्थान असलेल्या नायगावमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. नायगावमध्ये चांगले ग्रामसचिवालय उभारले जाईल. येथील शाळेच्या इमारतीची काहीशी दुरावस्था झाली आहे, त्यासाठी निधी दिला जाईल, असेही अजित पवार म्हणाले.