बिहार; इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमातच ८७ डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण


पाटणा – बिहारच्या नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ८७ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्ताला पाटण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी दुजोरा दिल्याचे मिंटने आपल्या वृत्तात म्हटले आहे. सोमवारी सकाळी यासंदर्भातील माहिती देताना जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरांपैकी काहींना कोणतीही लक्षणे दिसत नसली, तरी काहींना सौम्य लक्षणांचा त्रास होत असल्याचे म्हटले. या सर्व डॉक्टरांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

या कॉलेजमध्ये मागील आठवड्यात इंडियन मेडिकल असोसिएशनचा एक कार्यक्रम पार पडला होता. याच कार्यक्रमामधून डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचाही समावेश होता.

पाटण्याच्या एम्समधील दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. राज्यामध्ये रविवारी कोरोनाचे एकूण ३५२ रुग्ण आढळून आले. शनिवारच्या आकडेवारीपेक्षा ही संख्या ७१ ने अधिक होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सक्रीय रुग्णांची संख्या एक हजारांहून अधिक झाली असून सध्या राज्यामध्ये १ हजार ७४ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. बिहारमध्ये शुक्रवारी २८१ तर शनिवारी १५८ कोरोनाबाधित आढळून आले होते. पण सुदैवाने मागील चार दिवसात बिहारमध्ये कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. बिहारमधील कोरोना मृतांचा आकडा हा १२ हजार ९६ एवढा आहे.

पाटणा जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. त्या खालोखाल गया जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून तिथे ११० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांपैकी पाटण्यात ५४४ तर गयामध्ये २७७ रुग्ण आहेत. म्हणजेच एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण या दोन जिल्ह्यांमध्ये आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू झालेल्या राज्यांच्या यादीमध्ये बिहार हे अव्वल स्थानी असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.