पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीचे नागरिकांना आवाहन


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने पेगासस हेरगिरी प्रकरणी महत्त्वाचे आवाहन केले आहे. पेगासस स्पायवेअरद्वारे फोन हॅकिंग झाल्याचा संशय असल्यास सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतचे आवाहन करणारी नोटीस देशातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतासह जगभरात पेगासस स्पायवेअर प्रकरणामुळे खळबळ उडाली होती.

ही नोटीस सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तांत्रिक समितीने प्रसिद्ध केली आहे. आपल्या मोबाइलमध्ये ज्या नागरिकांना पेगासस स्पायवेअरद्वारे हल्ला करण्यात आल्याचा संशय आहे, त्यांनी 7 जानेवारी 2022 च्या आधी एक ई-मेल पाठवणे गरजेचे असल्याचे प्रसिद्ध केलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे.

समितीने म्हटले की, जर तुम्ही दिलेले कारण योग्य वाटल्यास समिती तुमचा मोबाइल तपासणीसाठी मागण्याची विनंती करेल. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने म्हटले की, इस्रायलच्या एनएसओ ग्रुपच्या पेगासस स्पायवेअरचा वापर करून मोबाइल हॅक केल्याचा संशय भारताच्या कोणत्याही नागरिकाला असल्यास त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीसोबत संपर्क करावा.

नोटीसमध्ये असे देखील म्हटले की, तुमचा मोबाइल पेगासस स्पायवेअरद्वारे का हॅक करण्यात आला असावा, तुमचा मोबाइल तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या समितीकडे तपासणीसाठी देण्याच्या स्थितीत आहे का, आदी विचारणाही करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीकडून मोबाइल जमा करणाऱ्यांना एक पावती देण्यात येणार असून एक डिजीटल फोटोदेखील देण्यात येणार आहे. हे सगळे नवी दिल्लीत फोन एकत्र करण्यात येणार असून तपासणीनंतर त्यांना पुन्हा देण्यात येणार आहे.