बॉलिवूडमध्ये पदार्पणावर अल्लू अर्जुन म्हणतो


काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद या चित्रपटाला मिळत असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. चित्रपटाने कमाईच्या बाबतीतील नवे रेकॉर्ड जगभरात केले आहेत. या चित्रपटाच्या यशानंतर आता अल्लू अर्जुन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. यावर वक्तव्य करत स्वत: अल्लू अर्जुनने पूर्णविराम दिला आहे.

अल्लू अर्जुनने नुकतेच पीटीआयशी बोलताना बॉलिवूड पदार्पणावर वक्तव्य केले. अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर मला आल्या होत्या. पण ते चित्रपट एवढे चांगले नव्हते. मला आशा आहे की लवकरच एखाद्या चांगल्या चित्रपटाची मला ऑफर मिळेल. पण हे करण्यासाठी धैर्य लागते. एखाद्या दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये काम करणे, थोडे रिस्की असते, असे अल्लू अर्जुन म्हणाला. लवकरच अल्लू अर्जुन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.

१७ डिसेंबर २०२१ला ‘पुष्पा’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आयटम साँग देखील केले आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे.