अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण


देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. काही बॉलिवूड कलाकारांना गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रूंचाल यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दल जॉनने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

जॉनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, मी एका व्यक्तीच्या संपर्कात तीन दिवसापूर्वी आलो होतो, मला नंतर लक्षात आले की त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. माझी पत्नी प्रिया आणि मला कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच क्वारंटाईन झालो आहोत. दोघांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. आम्हाला सौम्य लक्षणे आहेत. तुम्ही सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या. मास्कचा वापर करा. जॉन अब्राहम लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या आगामी ‘पठान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जॉनसोबतच या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान हे कलाकार देखील दिसणार आहे.