स्टेट्स सिम्बॉल बनलेले ब्लॅकबेरी फोन आता निरुपयोगी

एके काळी स्टेटस सिम्बॉल बनलेले ब्लॅकबेरी स्मार्टफोन आता केवळ डबडी बनले आहेत. कंपनीने ४ जानेवारी पासून क्लासिक सपोर्ट बंद केल्याची अधिकृत घोषणा केली आहे त्यामुळे हे फोन आता निरुपयोगी ठरले आहेत. ज्यांच्याकडे असे फोन आहेत त्यांना आता त्यावरून कॉल करणे, एसएमएस करता येणार नाहीत, डेटा अॅक्सेस करता येणार नाही अथवा इमर्जन्सी सेवेसाठी सुद्धा त्याचा वापर करता येणार नाही.

सीएनएनच्या बातमीनुसार कंपनीने त्यांच्या लोकप्रिय क्वार्टी की पॅड ब्लॅकबेरी ओएस फोनचे उत्पादन बंद केल्याची घोषणा सप्टेंबर २०२० मध्ये केली मात्र जे फोन वापरात होते त्यांना सोफ्टवेअर सपोर्ट सुरु ठेवला होता. कंपनीने ब्लॅकबेरी लिमिटेड नावाने जगभरात उद्योग, सरकारे आणि सिक्युरिटी सोफ्टवेअर सेवा देण्यावर लक्ष केंद्रित केले होते. फोन उप्तादन बंद करणे हा त्याचाच एक भाग होता. २०१६ मध्येच कंपनी फोन व्यवसायातून बाहेर पडली पण काही वर्षे अँड्राईड सॉफ्टवेअरवर ५ जी ब्लॅकबेरी डिव्हाइस साठी टीसीसी व सिक्युरिटी स्टार्टअप ऑनवर्ड मोबिलिटी सह अनेक फोन उत्पादकांना ब्रांड लायसन्स देत होती. ब्लॅकबेरीची लोकप्रियता आयफोन प्रमाणेच होती. त्याच्या सिक्युरिटी सेफ्टी फीचर्स मुळे त्याला खूप मागणी होती.

१९९० ते २००० या काळात फिजिकल की बोर्ड असलेले हे फोन इतके लोकप्रिय होते की त्याला क्रॅक बेरीज असे नाव मिळाले होते. अनेक सेलेब्रिटींच्या हातात हेच फोन दिसत असत. अगदी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा सुद्धा हाच फोन वापरत असत. २०१२ पर्यंत या फोनचे ८० लाख अॅक्टीव्ह युझर्स होते असे आकडेवारी सांगते.