नोबेल विजेते डेसमंड टूटू यांच्यावर इच्छेनुसार अंत्यसंस्कार

द. आफ्रिकेत वर्षानुवर्षे वर्णभेदविरुद्ध लढाई दिलेले नोबेल शांतता पारितोषिक विजेते आर्कबिशप डेसमंड टूटू यांच्यावर रविवारी त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार केले गेले. त्याचे दहन अथवा दफन केले गेले नाही तर एक्वामेशन पद्धतीने त्यांचे अंत्यसंस्कार झाले. यात अग्नीऐवजी पाण्याचा वापर केला जातो.

सीएनएनच्या रिपोर्ट नुसार आर्कबिशप डेसमंड टूटू यांनी त्यांच्यावर पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याप्रकारे अंत्यसंस्कार व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार एक्वामेशन किंवा एल्कोमीन हायड्रोलीसीस पद्धतीने हे अंतिम संस्कार केले गेले. यात शव उच्च दाबाच्या धातूच्या सिलिंडर मध्ये पाणी व पोटॅशियम हायड्रोक्साईड यांच्या मिश्रणात ३ ते ४ तास १५० डिग्री तापमानावर गरम केले जाते. यामुळे उर्जेची ९० टक्के बचत होतेच पण ग्रीन हाउस गॅस सुद्धा तयार होत नाहीत.

या क्रियेत शरीर द्रव पदार्थात बदलते आणि फक्त हाडे शिल्लक राहतात. त्याची पूड करून अस्थी कलश परिवाराला सोपविला जातो. या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यास काही देशांनी मान्यता दिली आहे. ९० वर्षीय टूटू यांच्यासाठी त्यांच्या इच्छेनुसार बाजारात उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त कफिन खरेदी केली होती असेही सांगितले जात आहे.