उष्ण हवेच्या सौदीत बर्फवर्षाव, पर्यटकांची गर्दी

वाळवंटी आणि उष्ण हवामान असलेल्या खाडी देशात बर्फ वर्षाव किती अपूर्वाईची घटना असेल याची कल्पनाच केलेली बरी. यंदा सौदी अरेबियाच्या उत्तर पश्चिम शहरात, ताबुक मध्ये इतकी प्रचंड बर्फवृष्टी होते आहे की स्थानिकच नाही तर पर्यटक सुद्धा आनंदाने वेडे झाले असल्याचे दिसून आले आहे. येथे यंदा बर्फाचा आनंद लुटतानाच पारंपारिक नृत्ये आणि संगीताला सुद्धा उधाण आले आहे. याचे फोटो सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाले आहेत. अर्थात सौदी मध्ये बर्फवृष्टी होण्याची ही पहिली वेळ मात्र नाही.

ताबुक मधी अल लोज पर्वतावर बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. बीबीसीच्या बातमीनुसार गतवर्षी फेब्रुवारी मध्ये येथे रेकॉर्ड बर्फवृष्टी झाली होती. जबल अल लव्ज, जबल अल ताहीर, जबल अल्कान पर्वत बर्फाने झाकले गेले आहेत. २६०० मीटर उंचीच्या या पर्वताला आलमंड माउंटन असेही म्हटले जाते कारण येथे बदामाची झाडे फार मोठ्या प्रमाणावर आहेत.

जॉर्डनला लागून असलेल्या या प्रदेशात दरवर्षी विविध हंगामात बर्फवृष्टी होते. खाडी देशांसाठी हिमवर्षाव हि दुर्लभ घटना आहे. यामुळे रात्री गारवा वाढतो आणि तापमान एकदम घसरते. रियाद, मक्का, मदिना, अल बहा, जजना, ताबुक अल जौक येथेही पाउस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.