काल दिवसभरात देशात 27 हजार 553 कोरोनाबाधितांची नोंद; ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 1525 वर


नवी दिल्ली – देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकडेवारीसोबतच ओमिक्रॉनबाधितांच्या आकडेवारीतही मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनने जगासोबतच देशाचीही चिंता वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 27 हजार 553 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 284 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात आतापर्यंत 1525 ओमिक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून एक लाख 22 हजार 801 वर पोहोचली आहे. अशातच या महामारीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 81 हजार 770 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (शनिवारी) 9249 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 84 हजार 561 रुग्ण कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत.

आतापर्यंत देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 1525 बाधित आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत 23 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 460 रुग्ण, दिल्लीत 351 रुग्ण तर गुजरातमध्ये 136 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान राज्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून काल कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. राज्यात काल (शनिवारी) तब्बल 9,170 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1,475 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे झालेल्या गर्दीमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटनेही चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित महाराष्ट्रात आहेत.